हायब्रिड फंड म्हणजे काय?
जेव्हा आपण जेवतो, तेव्हा आपल्या खाण्याच्या निवडीवर आपल्याकडे असणारा वेळ, त्यावेळची परिस्थिती आणि आपला मूड या सर्वांचा प्रभाव पडतो. जर आपल्याला घाई असेल, जसे ऑफिसच्या लंचच्या वेळेत किंवा बस/ट्रेनमध्ये बसायच्या आधीची वेळ असेल, तर आपण एखादा कॉम्बो घेतो. किंवा जर एखाद्या ठिकाणचा कॉम्बो प्रसिद्ध असेल, तर आपण मेन्यूकडे पाहात सुद्धा नाही. पण सावकाश खायचे असेल तर आपण मेन्यू मधील पदार्थ आपल्याला हवे तेवढे मागवतो.
तसेच, म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकदार अनेक स्किम्स पैकी निवड करून त्यांत गुंतवणूक करू शकतात, उदाहरणार्थ इक्विटी फंड, डेब्ट फंड, गोल्ड फंड, लिक्विड फंड इत्यादी. तसेच, काही कॉम्बो सारख्या स्किम्स सुद्धा असतात – ज्यांना हायब्रिड स्किम म्हणतात. पूर्वी बॅलेंस फंड म्हणून ओळखले जाणरे हे ह्या हायब्रिड स्किम्स, दोन किंवा अधिक प्रकारच्या अॅसेट क्लास मध्ये गुंतवणूक करतात ज्यामुळे गुंतवणूकदारांना दोन्हीचा फायदा होतो. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगजगतामध्ये अनेक प्रकारचे हायब्रिड फंड आहेत. काही स्किम दोन अॅसेट्स मध्ये गुंतवणूक करतात, जसे इक्विटी आणि डेब्ट, किंवा डेब्ट आणि सोने. तर काही स्किम इक्विटी, डेब्ट आणि सोने ह्या तिन्हींमध्ये गुंतवणूक करतात. तरीही, काही प्रसिद्ध हायब्रिड स्किम्स ह्या इक्विटी आणि डेब्ट अॅसेट्स मध्ये गुंतवणूक करतात.
निरनिराळ्या प्रकारचे हायब्रिड फंड्स निरनिराळ्या अॅसेट्स अलोकेशन नितींचे पालन करतात. गुंतवणूक करण्याआधी आपली उद्दीष्टे स्पष्ट असणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या.